प्रत्येक गावामध्ये वीर दुधाई धाराऊ माता गाडे यांचे नाव पुन्हा पोहचणार !
1 min read
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
‘मिशन धाराऊ-माता दुग्धामृतम’ अभियान राज्यभर राबविणार : आदिती तटकरे महिला व बालकल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य.
सातारा : बालकांची निरोगी वाढ व्हावी, प्रतिकारशक्ती वाढून कायम राहावी, यासाठी प्रसूती होताच एक तासाच्या आत बालकाला मातेने स्तनपान सुरू करणे गरजेचे असते. मात्र, जिल्ह्यात याचे प्रमाण फक्त ४६.४ टक्के असून, त्यामध्ये सुधारणा व्हावी, पिढी सुदृढ व्हावी, कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने मिशन धाराऊ अभियान राबविले जात आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मानंतर सईबाई राणीसाहेब यांना बाळंत व्याधी सुरू झाला. बाळ शंभू राजेंना दुधाची कमतरता भासू नये व त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ नये या साठी कापूरहोळच्या तुकोजी गाडे पाटलांच्या पत्नी धाराऊ गाडे पाटील या शंभूराजांच्या “दुधाई” बनल्या.
हाच इतिहास डोळ्यासमोर ठेवत सातारा जिल्हा परिषदेने स्तनपानाबाबत नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आणि या उपक्रमास ‘मिशन धाराऊ-माता दुग्धामृतम’ असे नाव दिले. हे अभियान २०२१ मध्ये सुरू केले असून. जिल्ह्यात स्तनपान आणि शिशुपोषण विषयाची सामाजिक लोकचळवळ निर्माण करण्याचा उद्देश होता; बालकाच्या शारीरिक विकासात स्तनपानाची भूमिका मोलाची आहे. परंतु, आजही समाजात याबाबत गैरसमजुती आणि कुप्रथा पाळल्या जातात. याचा परिणाम नंतर बालकांच्या वाढीवर होतो. यासाठीचे मार्गदर्शन सोप्या पद्धतीने होण्यासाठी तसेच जन्मानंतर एक तासाच्या आत बाळाला स्तनपानाचे प्रमाण वाढविणे, बाळाच्या सहा महिन्यांनंतर दोन वर्षांपर्यंत स्तनपानाबरोबरच वरच्या आहाराचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने ‘मिशन धाराऊ-माता दुग्धामृतम’ अभियान सुरू आहे.
या अभियानाचे यश पाहता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ‘मिशन धाराऊ-माता दुग्धामृतम’ अभियान महाराष्ट्र राज्यात राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. मुंबईत मंत्रालयात याबाबत बैठक घेत. या बैठकीला सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे उपस्थित होत्या. यावेळी मंत्री तटकरे यांनी ‘मिशन धाराऊ-माता दुग्धामृतम’ तसेच अभियानाच्या यशाबद्दल माहिती घेतली. याचा फायदा गर्भवती महिला तसेच स्तनदा मातांना मोठ्या प्रमाणात झालेला आहे. या अभियानाचा उद्देश पाहून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हे अभियान राबविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. तसेच याबाबत त्यांनी संबंधित विभागाला सूचना केल्या आहेत. स्तनपानाची आवश्यकता, गरोदर मातांनी घ्यावयाची काळजीबाबत पुस्तिकेच्या माध्यमातून जनजागरण
- स्तनपानाच्या बाबतीत असलेल्या कुप्रथा बंद व्हाव्यात, यासाठी प्रबोधन केले जाणार
- गरोदर व स्तनदा मातांसाठी हेल्पलाइन सुरू करणार
- गावागावांत मार्गदर्शनासाठी धाराऊ पथकांची स्थापना
- प्रसूती विभाग असणाऱ्या रुग्णालयातील प्रसूती विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार
- सर्व हॉस्पिटलना स्तनपानाची माहिती प्रसूत महिलांना देण्याचे सक्तीचे करणार
- शिशुगृहातील बालके, अनाथ बालकांसाठी ह्यूमन मिल्क बँकेचे नियोजन
- शासकीय, इतर कार्यालयात हिरकणी कक्ष उभारले जाणार
सातारा जिल्हा परिषद प्रमाणेच संपूर्ण देशभरात ‘मिशन धाराऊ-माता दुग्धामृतम’ राबविणे गरजेचे आहे या मुळे
गैरसमजुती व कुप्रथा थांबण्यास मदत होईल.तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविल्यामुळे या अभियानाच्या माध्यमातून वीर धाराऊंचे नाव राज्यातील गावा-गावांत पुन्हा एकदा घेतले जाणार आहे.
-अमित गाडे पाटील (वीर दुधाई धाराऊ गाडे पाटील वंशज)
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space