माणूसपण जागं करणारी ती शाबूत ठेवणारी गोष्ट म्हणजे कविता : डॉ. अरुणा ढेरे
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय मराठी काव्य संमेलन संपन्न
पुणे : हा काळ व्यक्तींचं, माणसांचं अवमूल्यन करत चाललेला काळ आहे. आजच्या गलबलल्या कोलाहलानं, कल्लोळानं, हुल्लडबाजीनं भरलेल्या वास्तवात माणसाच्या बधिर होत चाललेल्या संवेदनांना जाग आणणारी, त्याचं माणूसपण जागं करणारी ती शाबूत ठेवणारी गोष्ट म्हणजे कविता म्हणजे साहित्य. माणसाच्या माथ्यावरचं खूजं होत चाललेलं आभाळ पुन्हा उंच नेण्याची शक्ती कवितेतून, साहित्यातूनच मिळेल. असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवा निमित्ताने बालगंधर्व रंगमंदिर (पुणे) येथे राष्ट्रीय मराठी काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या काव्य संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी होते. या प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. विजय खरे उपस्थित होते. प्रास्ताविक राष्ट्रीय मराठी काव्य संमेलन समितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी केले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात स्थानिक व मातृभाषेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. त्यादृष्टीने विविध भाषांमधून मराठीत अनुवाद निर्माण करणे, विज्ञान व तंत्रज्ञानात्मक विषय मराठीतून शिकवणे, स्थानिक भाषांना प्रोत्साहन देणे अशा आघाडयांवर हे विद्यापीठ काम करीत आहे. तळागळातील लोकांची भाषा अधिक प्रवाही, लवचिक आणि आशयसंपन्न असते. या गोष्टीकडे आपण लक्ष दिले पाहिजे. या सर्वसामान्य लोकांच्या भाषेतच अद्ययावत ज्ञान लपलेले असते. हे ज्ञान अक्षरबद्ध करण्याची गरज आहे असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी व्यक्त केले.
या काव्य संमेलनात कवी अरुण म्हात्रे (मुंबई) यांनी ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची दूर ती गेली तरीही सावली भेटायची, इंद्रजित भालेराव (परभणी) यांनी बाप म्हणायचा काढलेली नखं दारात कधीच नको टाकू, कल्पना दुधाळ (उरुळी कांचन) यांनी या शहरात जिथं माझ्या पायांची माती गळून पडली तिथं गवत उगवलय बघा, प्रकाश घोडके (मिरजगाव) यांनी तोंड झाकले तरी मन असतेच ना उगडे, सरिता पवार (सिंधुदुर्ग) यांनी कोरड्याठक्क कातळकडांवरील इवल्याशा जिवंत उमाळ्यातून जन्मलेली विहीर, अंजली कुलकर्णी (पुणे) यांनी शाळेत चाललाय चित्रकलेचा तास…विषय दिलाय ‘ चित्र खेड्याचे ‘ तसा जुनाच…”, डॉ. संतोष पवार (श्रीरामपूर) तुला न्यायला मुराळी का आला गं नाही… कामात असलं म्हणून आला नाही., डॉ. स्मिता पाटील (मोहोळ) यांनी ती तेव्हा हरवली होती काचा पाणी जिबलीच्या खेळात काचेत पाहत होती स्वतःला, हर्षदा सुंठणकर (बेळगाव) यांनी कपडे वाळत घालणारी बाई,अविनाश भारती (बीड) यांनी चुडा तुझ्या नाजूक हातात सखे चुडाही नाजूक माझी नजर भावुक त्याला सारे ठाऊक, तुकाराम धांडे (अकोले) यांनी रान कविता सोपी गोस्ट नाही भाऊ, प्रा. प्रदीप पाटील (इस्लामपूर) यांनी लेक सासरी जाताना वेडीपासी होयची माय दूर वासरू जाताना जशी हंबरावी गाय, रेवती दाभोळकर (बडोदा) मनातल्या मनात एक पाखरू उनाडते, ज्ञानेश्वर तिखे (इंदोर मध्यप्रदेश) यांनी माझा बाप जीव पेरतो मातीत, भरत दौंडकर (शिक्रापूर) यांनी गुंठा गुंठा विकून गोफ आली गळ्यात, गोव्याच्या हेमंत अय्या यांनी “रांध घरातून चुकूनच कविता बाहेर येते.” या कवींच्या बहारदार कविता सादर करत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आस्वाद काव्य संमेलनाचे सूत्रसंचालन अरुण म्हात्रे यांनी केले. आभार मराठी विभाग प्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे यांनी मानले.
या काव्य संमेलनाचे संयोजन विद्यापीठ अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय मराठी काव्य संमेलन समितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. धोंडीराम पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्रीमती बागेश्री मंठाळकर, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. तुकाराम रोंगटे, अधिसभा सदस्य सचिन गोरडे पाटील, डॉ. प्रभाकर देसाई, डॉ. संदीप सांगळे यांनी केले.
या प्रसंगी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. संदीप पालवे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. संगीता जगताप, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. ज्योत्स्ना एकबोटे आदी उपस्थित होते. मोठ्या संख्येने श्रोत्यांनी या संमेलनास प्रतिसाद दिला.
उदघाटन सत्राचे सूत्रसंचालन डॉ. प्रभाकर देसाई यांनी केले तर आभार विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. विजय खरे यांनी मानले.
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space