हिंदवी स्वराज्याची राजधानी राजगड आता तालुका म्हणून ओळखला जाणार
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
शिव संवाद उपसंपादक : विलास बांदल
वेल्हे : हिंदवी स्वराज्याची प्रथम राजधानी किल्ले राजगड, गडांचा राजा आणि राजांचा गड म्हणजे किल्ले राजगड, छत्रपती शिवरायांनी २६ वर्ष आपल्या स्वराज्याचा कारभार ज्या ठिकाणावरून चालविला तो किल्ले राजगड, आज तालुका म्हणून नावारूपास येत आहे. आज राज्य मंत्रिमंडळामध्ये झालेल्या निर्णयानुसार वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका म्हणून करण्यात आले.
आज आमची दिवाळी आज आमचा दसरा छत्रपती शिवरायांचे सर्वाधिक वास्तव्य आणि कारकीर्द असलेला आमचा हा परिसर शासन दरबारी तालुका म्हणून ओळखला जाणार आहे याचा प्रचंड अभिमान असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे आम्ही वेल्हेकर आभारी आहोत अशी प्रतिक्रिया सरपंच मालवली, वेल्हे (राजगड) तालुका शिवसेना प्रमुख सुनिल शेंडकर यांनी दिली.
छत्रपती शिवरायांच्या सर्व सुखदुःखाचा साक्षीदार असलेला हा किल्ले राजगड अनेक वर्ष विकासापासून वंचितच राहिला. आज देखील तो डागडुजीच्या प्रतीक्षेत आहे. हे जरी खरे असले तरी. आजपासून वेल्हे तालुक्याची ओळख ही तालुका राजगड म्हणून होणार असल्याने शासनाच्या या निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत केले जात आहे. स्थानिकांची अनेक वर्षांची मागणी होती की वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका म्हणून करावे. वेळ गेला पण अखेर मागणी पूर्ण झाली याचा खूप आनंद असल्याचे गुंजवणे गावचे सरपंच गुलाब रसाळ यांनी सांगितले.
या विभागाच्या खासदार सुप्रिया सुळे व आमदार संग्राम थोपटे यांनी वारंवार प्रशासकीय पातळीवर वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका असे करावे याबाबत पाठपुरावा केला. त्या नुसार तत्कालीन विभागीय आयुक्त यांनी तसा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला. मागील वर्षी खासदार सुप्रिया सुळे यांनी राजगड येथे भेट देताना सांगितले होते की लवकरच वेल्हे तालुक्याचे नामकरण हे राजगड झालेले आपल्याला पाहायला मिळेल. असे वेल्हे तालुका शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे तालुका अध्यक्ष संतोष रेणुसे यांनी सांगितले.
किल्ले राजगड ही फक्त स्थानिकांचीच नाही तर तमाम मराठी जणांची, गडप्रेमींची, पर्यटकांची आणि देश विदेशातील शिवप्रेमीची अस्मिता आहे. याचे भान आम्हा स्थानिकांना आहे वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड करावे अशी अनेक वर्षाची आमची मागणी पूर्ण झाली असून. यामध्ये ज्या ज्या कोणाचे योगदान असेल त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. असे राजगड पायथा चिरमोडीचे माजी सरपंच व विविध कार्यकारी सेवा सोसायटी लव्ही बुद्रुकचे माजी अध्यक्ष किसन रसाळ यांनी सांगितले.
वेल्हे तालुक्याचे राजगड तालुका असे नामकरण करण्याबाबत व गडकोटांच्या विकासाबाबत खा. सुप्रिया सुळे, आ. संग्राम थोपटे यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देतानाच लवकरच वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड असे होणार असल्याचे सांगितले होते.
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space